माझी ब्लॉग सूची

बुधवार, डिसेंबर २३, २००९

भानसने मला टॅगले म्हणुन ही पोस्ट.
1.Where is your cell phone?


बहुतेक वेळा कुठेतरी पडलेला असतो आत्ताही असेल कुठेतरी.



2.Your hair?

थोडे कुरळे.



3.Your mother?

नाही.

4.Your father?

आहेत.

5.Your favorite food?

मामीच्या हातची पुरणपोळी.



6.Your dream last night?

गाढ ज़ोपले होते.



7.Your favorite drink?

चहा (आले घालुन.),कॉफीही कधिकधि.



8.Your dream/goal?

मुलीला खुप मोठी झालेली पाहणे.



9.What room are you in?

हॉल.



10.Your hobby?

वाचन,गाणी ऐकणे.



11.Your fear?

समोरचा कुणीही आजारी असेल तर मला भिती वाटते.(स्वत:च्या आजाराविषयी नाही वाटत.)

12.Where do you want to be in 6 years?

महाराष्ट्रात.



13.Where were you last night?

घरीच.



14.Something that you aren’t diplomatic?

कोणाबरोबरही.

15.Muffins?

कोणतेही चॉकलेट.

16.Wish list item?

रोज बदलतात.

17.Where did you grow up?

मिरज, नाशिक.



18.Last thing you did?

खालच्या आजोबांकडे दाराचा आवाज आला म्हणुन डोकावले.(सध्या ते एकटेच असल्याने माझे लक्ष त्यांच्याकडेच आहे.

19.What are you wearing?

जींस टॉप.(फिरायला जाउन आल्यावर तशीच बसलेय नेटवर)



20.Your TV?

समोर काहिही चालु असलेले पाहते.मी स्वत: लावत नाही.



21.Your pets?

नाहीत.

22.Friends

तसे खुप आहेत.पण सर्वात जवळचा अभि.(माझा मित्र,प्रियकर,अन आता नवरा.)



23.Your life?

खाओ पिओ ऐश करो.



24.Your mood?

आज मस्त आहे लेकीला सुट्टी आहे.

25.Missing someone?

शौकिनची भेळ,मांडवीची,कॉलेज जवळच्या जलारामची दाबेली,हरिओम अन मामाज कडचे पदार्थ.(मी खुप खादाड आहे ना!)अन गडकिल्ल्यांची भटकंती.

26.Vehicle?

11 नं.(म्हणजे पायी पायी.)अन नवर्‍याची कॅलिबर.

27.Something you’re not wearing?

ठामपणे नाही म्हणणे.



28.Your favorite store?

खाण्याचे कोणतेही.

Your favorite color?

काळा.

29.When was the last time you laughed?

मी काळा रंग लिहील्यावर शेजारी बसलेला नवरा हसला.मग मी पण हसले.मला कधिही हसायला येते.अगदी फालतु गोष्टींवर(असे नवरा म्हणतो)कुणी रागावला तरी मला फस्सकन हसायला येते,त्यामुळे समोरचा जास्तच चिडतो.

30.Last time you cried?

कोणतेही चांगले गाणे,किस्सा ऐकताना वाचताना माझे डोळे भरतातच.परवा मंदाकिनी आमटे,प्रकाश आमटे यांना भेटल्यावरही भरुन आले.

31.Your best friend?

अभि(नवरा)

32.One place that you go to over and over?

किचन मध्ये(खादाडी आहे ना.)

33.One person who emails me regularly?

सगळेच मित्र मैत्रिणी रोज नाही पण नियमीत.हा हा हा.

34.Favorite place to eat?

वर लिहील्याप्रमाणे चांगले खायला मिळणारी सगळीच ठिकाणे आवडतात.

भानस ने मला टॅगले तिला धन्यवाद.मी अभिला टॅगते अन मुर्खानंदला.

बुधवार, नोव्हेंबर १८, २००९

माझं असं का होतं तेच कळत नाही.कधितरी आपण हे काय करतोय असं वाटायला लागतं.समोरचा आपल्याला गृहित धरतोय हे पाहिल्यावर आधी किती त्रास व्हायचा पण आजकाल आपल्याला कशाचच काही वाटत नाही याबद्दलही आज मला आश्चर्य वाटतयं.आपला अहम आता जागाही नाही.कुणीही यावं अन टपली मारुन जावं हे काय आहे? इतकी कशी बदलले मी?
स्वत्वच राहिलं नाही का माझ्यात? कुठल्याही सामाजिक प्रश्नांनीही पेटणारी मी आजकाल मात्र शांतच असते. आपल्याला त्रास नाही ना मग कशाला त्रास करुन घ्या. इतकेच काय त्रास झाला तरी आपण मोठेपणाने त्यांना माफ करावयाला हवे हे लगेच वाटायला लागते.
एवढा समजुतदार पणा खरच आहे अंगात का हा पळ आहे परिस्थिती पासुन.समोरच्याच्या सगळ्या गोष्टी खरच मी माफ करू शकते का?
आजकाल घरात वाचायला भरपुर आहे,नेट आहे टि.व्ही आहे तरीही मनात काहितरी हुरहुर आहेच.ह्या सग़ळ्यात माझे लिख़ाण मात्र मागे पडत चाललयं हे मात्र नक्की! पुर्वी कुठलिही वही हाताशी आल्यावर त्यातच त्यावेळी मनात आलेले विचार लिहीत असे.हा म्हणायचाही की अशी कुठेहि कशी लिहतेस कुणी वाचलं तर त्यावेळी मी म्हणायची की अरे माझे जगणे खुल्या पुस्तकासारखे आहे कुणीही यावे वाचावे.पण आता मात्र पि.सी वर बसल्यावर लिहायलाच येत नाही.पुर्वी काम करता करता विचार सुचत जायचे कितीतरी पुर्वीचे लेख वाचताना हे आपणच लिहले आहे का? असा प्रश्न पडतो.हे असं का होतं हेच कळत नाहीये. कोणाच्या लेखालाही प्रतिक्रिया देतानाही लिहलेल्या प्रतिक्रिया मी कितीतरी वेळा पुसल्या आहेत. काही लेखन प्रकाशित करतानाही स्वांतसुखापेक्षाही आपला आडाणीपणा तर दिसणार नाही ना अशी भितीच प्रथम वाटते.
आपल्याभोवती कोश उभा करुन त्यातच रहायची सवय तशी जुनीच आहे माझी.मी स्वत: खुश राहण्यापेक्षा दुसर्‍यांच्याच मनाचा विचार नेहमी करते.माझ्या कोणत्याही वागण्याबोलण्याने माझा प्रस्थापिताचा बुरखा फ़ाटणार तर नाही ना ह्याची सतत काळजी घेतच कोणतिही गोष्ट करते.
मला कधितरी(   (  म्हणजे बर्‍याचदा) बघा परत बुरखा आलाच) माझ्या कर्तव्याचाही कंटाळा येतो खरच अन असा विचार  येतो म्हणुन त्रासही होतो. घरात माझेच म्हणणे चालावे हा अहम हि नेहमी मनात असतोच पण बघा तुमच्यासाठी मी किती करतेय हे दाखवायची पण फार हौस असतेच मनात.अन मी एवढे ह्या सगळ्यांसाठी करतेय तरी कोणाला त्याच काही आहे का? हे पण वर असतंच मनात!
स्वत: काही करत नाही अर्थाजन करत नाही हि बोच असुनही अरेरावीही आहेच मग घरची जबाबदारी तरी व्यवस्थित पार पाडावी तर ते ही फारसे मनापासुन होत नाही.अशी हि चिंतातुर जंतु मी!
जन्माला आला अन वाहता वाहता गेला असे सामान्य आयुष्य आहे खरे तर पण ते मानायलाही मन तयार आहे का बघा, समोरच्याने कायम आपल्याला डोक्यावरच घेतले पाहिजे हा हटट. समोरचा बोलायला आला नाही तर तो शिष्ठ.अन आला तर त्याच्या हेतुविषयीच शंका.रोज आला बोलला तर लोचट वगैरे!
समोरच्याला बघितल्यावरच त्याच्याविषयी एक पक्का ग्रह करुन घ्यायचा अन त्याच भावनेने त्याला जोखायच.हा नेहमी म्हणतो बदल हे. पण कळतय पण वळत नाही(का वलवुनच घ्यायच नाही?) अशी माझी अवस्था.आता परत हे मनात साठलेले त्याला बोलले असते नेहमीसारखेच तर तो हेच म्हणेल की रिकामी आहेस म्हणुन हे सगळं सुचतयं.त्याच्या पैशावर बसुन खातो हि बोच आहेच पण म्हणुन बाहेर जाउन काही करुन दाखवते का?तर तेही नाही माणसं आपणहोउन बोलतात तरी मला बोर होतं.बाहेरही पडायचा कंटाळा येतो. मी अशी कशी काय?मलाच काही कळेनासे झालेय.माझी सवय मुलीला लागतेय म्हणुन तो अस्वस्थ.
चला आज खरडल्या चार ओळी.

गुरुवार, ऑक्टोबर ०८, २००९

संवेदना: सुभाषिते.

संवेदना: सुभाषिते.या पाणिग्रहलालिता सुसरला तन्वी सुवन्शोद्भवागौरीस्पर्शसुखावहम गुणवतीम नित्यम मनोहारिणीमसा केनापि ह्रुता तया विरहितुम गन्तुम न शक्योस्म्यहमरे भिक्शो तव कामिनी , नही नही प्राणप्रिया यष्टीका

शनिवार, ऑक्टोबर ०३, २००९

सुभाषिते.

शाळेत असताना एक ते दहा अंकांची गंमत असणारी दहा सुभाषिते होती.आता सगळी आठवत नाहीत.तरी जाणकारांनी माहित असल्यास ती द्यावी.काही शब्द चुकले असायचीही शक्यता आहे.(काही शब्द तर मला टंकता येत नाहित निटसे.)


एकः स्वादिष्ट मश्नाति वस्ते वासश्च् शोभनम्

यो संविभुज्य भ्रुत्येभ्या कों न्रुश् सतरस्तथा 1



द्वामिमा वुदधो क्षेप्यो कंठे बध्वां द्रुढांम शीलाम

श्रीमान नो योह्र्ते दत्ते दारिद्र्य आलसस्य सदा.2



उत्तमा मध्यमा नीचा तिस्त्रो वे प्राणीनां विधा

परार्थ स्वार्थ विध्वंसा लक्षणानी यथा क्रमम3



प्राच्यवाची प्रतिचीच तुर्योदिची तथैवच

दिशश्च्तश्च प्रमुखा वन्दंते धार्मिका जना4



शनैर्विद्या शनैर्वित्तं शनैर्पर्वतमूर्धनि।शनै

शनै कंथा शनै पंथा पंचेतानी शनै शनै5



आम्ल स्तिक्थ कषायश्च मधुरो लवण: कटु

परत( तेच....... आठवत नाही)6



एन्द्रम धनु सप्तवर्णान बिभ्रत प्रावृषी शोभते

रत्नहारो मेघकंठे नानारत्नेर्नु गुंफीता:7



पादौ हस्तौ जानुनी द्वे उर छात: ललाटकं

अष्टांगेन स्प्रुषेन भुमी साष्टांग प्रणतिश्चसा8



शृंगार वीर करुणा अदभुत हास्य भयानक:

बिभत्स रौद्रौ शांतस्य काव्ये नवरसा मता9

मा मनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरुत

मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश:चंचला10

ह्यात बर्‍याच चुका आहेत माझ्या अल्पमतीनुसार मी हे लिहले आहे.

मंगळवार, सप्टेंबर २२, २००९

नवरात्र.

नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे.




गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची. त्यात येणारे पाळणे, खेळणी, शुंभ करोतीचे पुस्तक (ते आजीकडे अजूनही आहे) व वाटेत असणार्‍या गाडगीळ बाईंची भेळ (तशी भेळ मला भयानक आवडते) ही तेथे जाण्यासाठीची पुरक असणारी प्रलोभनं.

बहुतेक नवरात्रीत हादगा असायचा. त्यावेळी घरोघरी हादगा खेळायला, त्यातली गाणी जास्तीत जास्त मला येत असल्यामुळे मी आघाडीवर असायची. आमच्याकडेही एखाद्या दिवशी पाटावर हत्ती काढून त्याभोवती फेर धरला जायचा. चारला बाहेर पडलेली वरात अख्ख्या ब्राह्मणपुरीत फिरून साडेआठपर्यंत घरी येताना खिरापतीनं पोट भरलेली मात्र फेर धरून पाय टाकलेले, अशा थाटात घरी परतायची.



'बालाजीची सासू, कसल्या भाज्या, कसल्या उसळी.... अशा खिरापती ओळखण्यासाठी लावलेला सूर अजुनही सगळ्या मैत्रिणींच्या आवाजानिशी आठवतो. आमच्याकडे राधाबाई नावाची एक कामवाली यायची. तिला राधाबाई म्हटल्यावर फार राग यायचा. तिला मावशीच म्हणायला लागायचं. तिच्या अंगात येत होतं.(तिच्या अंधार्‍या घरात एक- दोनदा बहिणीसोबत गेल्याचं आठवतंय.) मी खोदून खोदून तिच्याकडून माहिती मिळवायची, तेव्हा कळायचं नाही पण 'डोक्यात जट आल्यावर मी झाड झाले... असं काहीबाही ती सांगायची' त्यावेळी माझ्या वेण्या ती घालत असे. तेव्हा ती मुद्दाम माझ्या जटा (केसातला गुंता) न काढता ही मलाही झाड बनवेल अशी भीती कायम माझ्या मनात असायची.



नंतर मिरज सुटलं मी नाशिकला आले. आजीच्या माहेरी रेणूका मातेचं मंदिर आहे. नवरात्रीच्या आदल्या रात्री मंदिर, गाभारा, मंदिरातील भिंतीवरील प्रतिमा, देवीची दागिने, पुजेचा सामान, सगळं साफ करताना रात्रीचे 2-3 वाजायचे. मंदिराचा गाभारा अगदी लहान होता. त्यात किरकोळ अंगकाठीचाच माणूस जाऊ शकत असे. त्यामुळे बाकी मंदिरे साफसुफ करायला मलाच जावे लागायचे. ते नऊ दिवस वातावरण भारलेलं राही. संध्याकाळी देवीसमोर सडा, रांगोळी काढली जायची. आमच्या शेजारी मारवाडी रहायचे पण ते सुध्दा खूप उत्साहाने या साफसफाईच्या कामापासून तर सजावटीपर्यंत सगळ्यात भाग घ्यायचे. त्यांची मुलगी तर रांगोळ्या सुरेख काढायची. संध्याकाळी तासभर आरती मग प्रसाद वाटप, रोज नवा ड्रेस, आपलं घरचं मंदिर म्हणून आरती म्हणताना पुढे पुढे करणं, अशा बर्‍याच गमती जमती असायच्या.



अष्टमीचा होम, मग त्या दिवशी उपास अन् रात्री त्या धुराचा त्रास. कधी कधी रात्री ग्रुपने कालिकेला जायची धूम. एखाद्या रात्री गरबा बघायला जायचं. (तोवर आपल्याही गरबा चांगला जमेल याचा 'कॉ‍न्फिडन्स' नव्हता.) आजीच्या बहिणीच्या अंगात यायचं. अशा बर्‍याच बायका तेव्हा त्या मंदिरात जमायच्या. त्यांच्या विषयी काहीसं गुढ, भीती, कुतुहलही वाटायचं. त्याबरोबर ग्रुपनी त्यांची केलेली उडवाउडवीही आठवतेय. त्यानंतर भीतीही वाटायची, की़ त्यांना हसल्यावर काही झालं तर...? याच काळात आजीच्या बहिणीकडे कालीपूजा असायची, त्यावेळी ती बंगालीत काय बोलायची ते आम्हाला कळायचं नाही. पण तिच्याविषयी मात्र भीतीयुक्त गुढ कायम राहिलं. तिच्याकडचे प्रसादाचे रसगुल्ले मात्र आम्ही खायला जायचो.



नाशिकची कालिकादेवी प्रसिद्ध. नवरात्रात कालिकेला रोज बायका सकाळी लवकर उठून अंघोळ करून पहाटेच जातात. आम्हीही जात असू. सगळ्या मिळून जाताना वाट कशी संपली ते कळतंच नसे. एवढेच अंतर एरवी चालून जाऊ म्हटलं तर ते अशक्य वाटे. तिथल्या जत्रेत मजा करायला जायचं तर ते म्हणजे रात्रीचं आणि ग्रुपने तरच धमाल यायची.



गरब्याचं प्रस्थ आजकाल बरच वाढलय. आता इकडे मध्य प्रदेशात आल्यावर तर गल्लोगल्ली दांडिया दिसतात. आमच्या लहानपणी किंवा महाविद्यालयीन जीवनात वेगळ्या वातावरणात आम्ही राहिलो. त्यामुळे गरब्याचं अप्रुपही वाटतंय, पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्‍या वाळूसारखं वाटतंय.

शनिवार, सप्टेंबर १९, २००९

घननघनन घन घनन घन मंगल छायो.:



मायबाप चित्रपटातील गाणी ही क्लासिकल बेस आहेत.त्यातील . " घनन घनन"हे गाण मी जेंव्हा पहिल्यांदा ऐकलं त्याच वेळेला मला ते गाणं प्रचंड आवडलं. त्यामुळे मला ते गाणं इथे लिहावसं वाटतयं.


घननघनन घन घनन घन मंगल छायो.:पावसाच्या नुसत्या चाहुलीनेही सगळीकडे वातावरण प्रसन्न झाले आहे.

बादलोंकी डोली मे बरखा आयो.:किती छान कल्पना आहे की ढगांच्या डोलीत बसुन एखाद्या राणी सारखी ती हळुहळु खाली अलगद उतरते आहे.

बुंदे हे दंग बिजुरी के संग बाजे मृदंग: पावसाचे हे टपोरे थेंब विजेच्या कडकडाटाबरोबरच मृदंगासारखाच नाद ह्या पृथ्वीवर येताना करतात असाच भास होतो.किती खरं आहे पहिल्या पावसाचा तो टपटप नाद अगदी नादवायला लावतो.

धरतीका अंग जलथल हो जायो: त्या पहिल्या पावसाच्या अशा वर्षावाने धरा अगदी अंतरबाह्य भिजुन जाते.

मनमन के द्वार खोले किवाड चले आरपार दु:ख तारतार:ह्या पावसाने मनाच्या सगळ्या दारंखिडक्या उघडल्या गेल्या आणी मनात खोलवर दाबुन ठेवलेली दु:ख ह्या पावसाच्या ओल्या शिडकाव्याने धुतली गेली.

मोरी प्यास बुझी फिर सुझ सुझी:किती खरं आहे जोवर स्वत:च्या प्राथमिक गरजाही भागल्या गेल्या नाहीत तर कोणी कितीही चांगुलपणाच्या गोष्टी सांगीतल्या तरी त्यासारखे वागणे जमेल का?पावसाचे कौतुकही त्याच्या आगमनाने तृप्त झाल्यावरच करणे शक्य आहे ना!

आयेहे एसे चैतन्य जैसे:तुझ्या येण्याने सगळीकडे नुसते चैतन्य सळसळले आहे.

मोरी उजड गयी मरुभुमी पर नाचे है मोर बनके फुहार:माझ्या ह्या ओसाड झालेल्या जमीनीवरही तुझ्या सरी मोराप्रमाणे थुईथुई नाचताहेत.त्यामुळे वातावरणच एकदम नादमय झाले आहे.

जल आयो जीवन आयो अब फिरसे सृष्टी जागेगी.:किती खरे आहे नाई.पाण्याशिवाय जगणे शक्य आहे का?धरेच्या उदरातुन अंकुर उगवण्यासाठीही पावसाचीच तर गरज आहे.

भुले बिसरे भटके देहं अब फिरसे दृष्टी जागेगी:मनातल्या जागलेल्या इछेमुळे डोळ्यात उद्याची स्वप्ने दिसु लागतील.

अब खिलेंगी कलिया और बहारे आनेको आतुर होगी:पृथ्वीच्या उदरातुन फुले उमलण्यासाठी उत्सुक असतील.सगळी झाडे फुलांनी,कळ्यांनी भरुन जातील.

इक राह मिली इक चाह मिली गिरनेसे पहिले बाह मिली:तुझ्या येण्याने मनात अनेक आशा निर्माण झाल्या. माझ्या जगण्याला अर्थ मिळाला.मला उध्वस्त होण्यापासुन तु वाचवलस.

बरसो तुम ऋतुराज निरंतर जीवन चलता रहे चिरंतर:किती यतार्थ वर्णन केलंय पावसाचं.खरच तो सगळ्या ऋतुंचा राजाच आहे.त्याच्यामुळेच इथे जीवन आहे.त्यामुळे तो कायम बरसतच रहावा.हे जीवन असेच पुढे चालु रहायला त्याच्यामुळेच मदत मिळणार आहे.पृथ्वीवरची जीवसृष्टी चिरंतर इथे आनंदाने नांदावी यासाठी तुच हवा आहेस.

आज है हम कल अगले होंगे,कालचक्र चलता जायो: आज तुझे गान गाणारे आम्ही आहोत. कारण तुझ्या कृपेची आज जशी आम्हाला गरज आहे,तशीच उद्या येणार्‍या पिढीचीही गरज भागवण्यासाठी तु असायलाच हवास.आम्ही आज तुझ्या कृपेचे अभिलाषी आहोत उद्या कोणी दुसरे तुझ्यासाठी आळवणी करतील,तेंव्हा तु मात्र असाच बरसत रहा.तरच हे कालचक्र चालु राहील.

किती आशेचे गान आहे हे!त्याची आळवणी फक्त स्वत:साठीच नाही तर उद्या येणार्‍या पिढीलाही त्याची गरज आहे हा किती मोठा विचार आहे.स्वत:पुरता विचार न करता आपण सगळ्यांच्या उपयोगी पडावे हा विचारही आपण पावसाकडुनच तर शिकलोय.तो ही नियमानी आपल्यासाठीच तर येतो.

शुक्रवार, सप्टेंबर ११, २००९

नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे भारती ठाकूर यांचे नर्मदा परिक्रमेवरचे पुस्तक म्हणजे आपल्या सारख्या शहरी मानसिकतेच्या लोकांसाठी हे एक जळजळीत अंजनच म्हणावे लागेल कारण आपल्या शेजार्‍याशी देखील आपण मदत करताना कचरतो,तिथे भारतीताईंना भेटलेली ही साधी अत्यंत गरीब पण मनाने फार श्रीमंत असणारी माणसे आपल्याला आपली जागा दाखवुन देतात. आपल्या दाराशी आलेला याचक बघताच त्याच्या हेतुविषयीच पहिल्यांदा आपण शंकीत होतो,पण खेडेगावात मात्र नर्मदा परिक्रमावासी लोकांना देण्यात येण्यार्‍या सदावर्तात ती लोक आपल्या जवळ अन्नाची कमतरता असताना स्वत: उपाशी राहुन त्यांना(परिक्रमावासींना)जी मदत करतात ते वाचुन आपल्या खुजेपणाची वारंवारं जाणीव होते.ज्या गावातुन त्या आणी त्यांच्या मैत्रीणी जात होत्या.ती गावं अतिशय साधी, तिथल्या घराघरांतुन त्यांचे पुर्वापार चालत आलेल्रे कष्ट तर दिसत होतेच पण वर्षानुवर्षे त्या मार्गावरुन जाण्यार्‍या परीक्रमावासीयांची काळजी घेण्याची व्रुत्तीही भरभरुन वाहत होती. भारतीताईंनी त्या त्या वेळी त्यांच्या मनात येणारे विचार त्यांच्या सखीशी गुजगोष्टींच्या स्वरुपात फार छान मांडले आहेत.प्रत्येक ठेकाणी आपल्या शहरी लोक़ांचा खुजेपणा तर वाचताना सारखा जाणवतो.आपण त्या गावकर्‍यांच्या जागी असतो तर खरच असे वागु शकलो असतो का?असा विचार सारखा मनात डोकावतो. . भारतीताईंची भाषाही फार सोपी आणी प्रवाही आहे.वाचताना तर त्या स्थानाची चित्रफीतच डोळ्यांसमोर असल्याचा भास होतो.वाटेत दिसणारे वेग़वेगळे पक्षी त्यांचे वर्णनही वाचनीय झाले आहे.जागोजागी आपल्यातला मी कसा जाणवतो,त्याचा भाव कसा बदलत जातो हे त्यांनी फार चांगल्या पध्दतीने मांडले आहे.एरव्ही आपल्या सुरक्षीत जगात वावरताना किती अकारण आणी अवाजवी गोष्टींचा संग्रह करत असतो हे ते वाचताना वारंवार जाणवते.स्वत:च्या सुरक्षीत जगात वावरतानाही आपण जेवढे निवांत नसतो त्याहुनही अधीक निवांत आपण त्या परिक्रमेत असताना होतो. वास्तवीक स्वत:कडे कोणताही संग्रह नाही.उद्या काय घडणार आहे त्याची शाश्वती नाही.एवढेच काय पण जेवणासाठीचीही तरतुद नसताना आपण कोणत्यातरी अद्न्यात शक्तीच्या भरवशावर आपण पुढे जात असतो.वाटेतल्या सगळ्या संकटाची काळजी घेणारा तो कोणत्या ना कोणत्यातरी रुपात आपली काळजी घेतो,मनातल्या बाळबोध इछाही तो पुर्ण करतो याचा प्रत्यय पदोपदी वाचताना येतो. वाटेत भेटणारे वेगवेगळे लोक,साधु,अध्यात्मातल्या अधिकारी व्यक्ती,आपल्या मनातल्या विवीध शंकांचे निराकरण अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचते.नर्मदेवर बांधण्यात येणार्‍या धरणामुळे विस्थापित होणार्‍यांचे वास्तव,त्याचे त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम लेखिका अगदी परीणामकारक रित्या आपल्यापर्यंत पोहोचवते.त्यातला ज्येष्ट व्रुध्दांचा प्रश्न तर डोळ्यातुन पाणीच काढायला लावतो.शहरी जीवनातील संकल्पना,आपले स्वत:चे नखरे,खाण्याच्या सवयी,स्वामित्वाची भावना,आपणच वाढवलेल्या आपल्या गरजा ह्या सगळ्यांची जाणीव पुस्तक वाचताना सारखी होत राहते.परिक्रमेत शारीर तसेच मानसीक सुद्रुढतेच्या कमाल पातळ्यांचा कस लागणार्‍या बर्‍याच घटना पुस्तकात वर्णीलेल्या आहेत.


परिक्रमेने काय मिळाले याचा विचार करताना आपले विचार,आचार आणी आपल्या जबाबदार्‍यांची जाणीव,निसर्गाचे जवळुन झालेले दर्शन अन त्यामुळे सम्रुध्द झालेले भावविश्व.आणी आपला कमी झालेला गंड या सर्वांचे शब्दचित्रण लेखिका आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाली आहे.

मंगळवार, सप्टेंबर ०१, २००९

गोळे काकु.

मिपावर भाषेसंद्र्भात दिलेल्या एका प्रतिसादात मी गोळे काकुंनी शिकवलेली भाषा वापरली होती। तेंव्हाच नवरा म्हणाला की त्यांच्याविषयी लिही. आमच्या मिरजेच्या घरात त्या व काका भाड्याने रहात होते.त्यांचे घर बांधायला काढले होते.त्या पाळणाघर चालवायच्या. परिस्थीती यतातथाच होती. पण त्यांच्या तेवढ्या परिस्थितीतही त्यांच्या घासातला घास त्या आम्हाला द्यायच्या.त्यांचे पाळणाघर एक आदर्श पाळणाघर होते.त्यांच्याकडे येणार्‍या मुलांना त्या रोज घरचा गरमागरम वरण भात खावु घालायच्या. मुलांना श्लोक, पाढे, शिकवायच्या. आमच्या घरात आजी,आजोबा आणी मी व माझा मावसभाउ रहायचो.तो आणी मी प्रचंड भांडायचो. तो तर माझ्यावरनं आजीशी पण वाद घालायचा. आमच्यातनं तर विस्तव पण जात नसे. आजीच्या डोळ्याच्या ओपरेशनच्या वेळी आठ दिवस त्या क़ाकुंनीच आम्हा दोघांना संभाळलं.
आत्ताच मी माझा ब्लोग मराठी ब्लोग विश्वला जोडला.सुरवातीला जोडायला जमले नाही.आता तुम्ही म्हणाल की हे सगळ काय लिहताय. पण पहिल्या लेखात लिहल्याप्रमाणे एका घरगुती बाईची ही एक साधी वही आहे. त्यात वेगळ असं काय सापडणार.

सोमवार, ऑगस्ट ३१, २००९

असंच लिहावसं वाट्लं म्हणुन....

आज पहिल्यांदाच मी मिपावर एवढा मोठा प्रतिसाद दिलाय मनात धाकधुक आहेच कोण काय म्हणेल.अभिला काय वाटेल. त्याच्या बुध्दिवादी लेखांपुढे माझे लेखन ते काय. पण आता मी हळुह्ळु लिहायला सुरवात करणार आहे. बाकी काही नाही तरी टंकायचा सरव तरी होइल.

बुधवार, ऑगस्ट २६, २००९

सहज.

मी मुळची मिरजेची।आता नंतर नाशिकचेही वास्तव्य आहे.सध्या मुक्काम इंदोरात.फार टंकायची सवय नाही.त्यामुळे येथे रोज थोडे थोडे लिहणार.दैनंदिनीच म्हणा हवेतर,लिहायची आवड आहे ओ. पण कोण काय म्हणेल ही भिती. रोज जो काही थोडा वेळ मिळेल तेंव्हा ईथे येउन लिहायची भुक भागवणार.ही एक प्रकारची डायरीच आहे म्हणा ना!अगदी घरगुती बाईची डायरी म्हणा हवेतर.चांगले वाईट असा फरक न करता मनातल्या गोष्टी इथे उतरवणार आहे. पुलंनी म्हटल्याप्रमाणेच मी म्हणते की ही एका घरगुती बाईची वही आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवांचा माणसांचा धांडोळा मांडण्याचा हा एक प्रयत्न. कदाचीत तो माझ्या नजरेतुनही असेल. बघा आवडतोय का ते!