माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, मार्च १८, २०११

हिंदुस्थानात जसजसे  वरवर  उत्तरेकडे सरकत जावे तसतसा होळीचा रंग चढत गेलेला दिसतो.या चढत्या रंगाची सुरवात मुंबईपासुन अहमदाबाद सुरत इंदोर भोपाळ  या मार्गे पार उत्तरप्रदेश बिहार पर्यंत पोहोचली आहे.
    प्रत्येक प्रांताचे तिथल्या स्थानिक वैशिष्ट्यांसह तिथे साजर्‍या केल्या जाणार्‍या सणसमारंभासहीत एक वेगळे  वैशिष्ट्य असते.मध्यप्रदेशात विशेषत: इंदोरमध्ये मनवली(हा खास इंदोरी मराठी बोलीतील शब्द आहे) जाणारी होळी  ही इतर वरच्या प्रांताप्रमाणे होळीच्या दिवशी साजरी न होता रंगपंचमी दिवशी खेळली जाते.कदाचित या ठिकाणी होळकरशाहीच्या स्थापनेपासुनच आपल्या रंगपंचमीची शान जपली जात असावी.
     होळकरांच्या काळात,चांदीच्या पिचकार्‍यांनी केशराचे पाणी उडवुन राजदरबार्‍यांमध्ये राजवाड्यात मानाची होळी खेळली जात असे.हीच परंपरा येथील जनतेने चालु ठेवलेली आहे. आजही तेथे कोणतेही सांस्कृतिक वा राजकिय प्रदर्शन (कार्यक्रम) राजवाड्याच्या साक्षीशिवाय साजरे होत नाहीत           आपल्याकडील मिरवणुकरथांप्रमाणे येथेही रंगांचे रथ निघतात.या रंगरथात दोन प्रकार असतात त्यांना फाग व गैर अशा नावानी  संबोधले जाते. फाग म्हणजे कोरड्या रंगाची धुळवड तर गैर म्हणजे रंगमिश्रीत पाण्याचा पुर्ण राजवाडा परीसरावर वर्षाव .या दोन्ही प्रकारच्या रंगोत्सवात  सामिल होणार्‍या लोकांबरोबरच आजुबाजुचे प्रेक्षक छान माखुन जातात.
      या रंगरथाबरोबरच राधा कृष्णाचे वेश परिधान केलेले युवकयुवती,फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात ,नाचत गात जाणारे सहभागी यांसह वेगवेगळे डिजे साउंडस अन त्यांच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे ही आपल्याकडील गणपतीच्या मिरवणुकांप्रमाणे एकामागुन एक आपापले सादरीकरण प्रस्तुत करत असतात.या प्रकाराला झॉंकी असे म्हणतात.
  जगण्याच्या प्रत्येक रसाचा आनंद चवीचवीने घेणारा खवैया इंदोरकर यावेळी रंगरंगीलाही होउन जातो हे वेगळे सांगायला नको.प्रत्येक घटना सण यांचा समरसुन आनंद घेण्याची वृत्ती इथल्या प्रत्येकाच्या नसानसात भिनली आहे.
     

शनिवार, डिसेंबर २५, २०१०

एक्स रे.

एक्‍स रे कशाचा असावा अस मला कुसुमाग्रजांच्‍या प्रेमगीताच्या (प्रेम कुणावर कराव च्या चालीवर  म्‍हणावस वाटायला लागंलय (अर्थातच त्‍यांची क्षमा मागून)
आता कोणी काय दुखतय असं विचारल्यावर "माझ नाक' असे उत्तर  दिल्यावर समोरच्याला ते उद्धटासारखे वाटले नाही तरच नवल.पण
(हे आता सरेगम मधल्या देवकी पंडीतच्या चालीवर) मला नाकाचा एक्स रे काढायला लावल्यामुळे हा प्रश्न उत्पन्न झालाय.
  आता एक्स रे रुम मध्ये गेल्यावर हा बाबा माझ्या नाकाचा एक्स रे कसा काढणार ह्या विवंचनेत असणार्‍या मला त्याने आधी उताणॆ मग पालथे अशा प्रकारात झोपायला लावले.मग मोठ्ठा आ करायला लाउन नाक अन तोंड त्या पृष्टभागाला टेकवायला लावलं.एकाच वेळी डोक्यावरचा लाईट आणी नाकाखाली घुईईईईईई........... असा आवाज यायला लागला.अन मी म्हणजे तो त्या खट्ट्या आम की झेरॉक्स कॉपीतला आंबाच असल्याचा भास झाला. 
 

सोमवार, डिसेंबर २०, २०१०

अभि जाउन आता जवळजवळ पाच महिने झाले. आता ह्यातुन बाहेर पडुन लिहायचे ठरवलेही होते. पण...(हा पण बरेचदा घात करतो नै) काल पहिल्यांदाच एका समारंभाला उपस्थित रहावे लागले. अगदी जवळचे असल्याने गेले. सोबत कन्यका होती. माझी सर्‍हुद माझ्या मनाची पुर्ण काळजी घेत होती. पण इतके गोंजारुन घ्यायची सवय़ नसणारी मी ह्या सगळ्या प्रसंगात जास्तच कानकोंडी झाले. अपंगांना सहानभुती का नको असते याची थोडीफार जाणिवही ह्यातुन झाली.
   निमीत्त होते बारशाचे.त्यामुळे "सवाष्णींची" असणारी लगबगही तिथे अपेक्षीत होती. माझ्या जावेने मला औक्षणासाठी मला बोलावले.दिवे लावतानाही सहभागी करुन घेतले. मात्र घुगर्‍या वाटताना तिच्या बरोबर सर्वांना हळदी कुंकु लावणारी माझ्या शेजारच्या मामीपर्यंत येउन परत गेली. त्यावेळी मी मुलीशी बोलत असल्यासारख्र करुन तीला मी पाहिले नसल्याचे दर्शवले. मात्र आमच्या **** ने तिला परत बोलावताना खुणवताना मी पाहिले.अन ते त्या कुंकु लावणारीनेही पाहिले. आता आली का पंचाईत.
मला त्यांच्यातले संभाषण कळले म्हणुन ती अस्वस्थ.अन तीला काय वाटेल मला कळलेलं बघुन,म्हणुन मी अस्वस्थ.  परत माझासमोर येउन मला कुंकु लावण्याचा तो कार्यक्रम पार पडला . आता आले ना लक्षात मी वर अपंगांचे उदाहरण का दिले ते.आता नुसत्या घुगर्‍या दिल्या असत्या तर काही बिघडले असते का.पण आम्ही कसे तुला " आमच्यातलेच" समजतो हे दाखवण्याच्या प्रयत्नात उरलेल्यांनाही माझ्याविषयी कळले.नाही बाकिच्यांना कळले याबद्द्ल मला आक्षेप नाही पण त्यांचा problem होतो ना एकतर मला सरळ विचारता येत नाही अन त्या हळु म्हणुन जी कुजबुज करतात ती मात्र मला स्पष्ट ऐकायला येत असते हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे गेल्या पाच महिन्यातला.
 मी तशी पहिल्यापासुनच  हे सगळॆ मानणारी नाही even अभि असतानाही मंगळसुत्राविषयी आम्ही दोघेही उदासिनच होतो. कारण आमच्या प्रितीविवाहाच्या सुरवातीच्या काळात मला मंगळसुत्र घालण्याइतके पैसेही त्याच्याकडे नव्हते.(आता मात्र तो नसताना हे मंगळसुत्र माझ्या जवळच्या व्यक्तींना मी "तशी" बघायला कशीतरी वाटते म्हणुन घालते. बघताय ना आपण स्वत:साठी कमी अन दुसर्‍यांसाठीच सगळं करतो.)
तर सांगायचा मुद्दा हा की त्यांनी मला अशा पारंपारीक कामात सहभागी करुन घ्यावे अशी माझी अजिबात इच्छा नाही.(ओ कामकंटाळी नाही मी. पण अशा वेळी नक्की काय करायचे तेच मला उमजत नाही.)
वर आमची कन्यका मला म्हणते की त्या तुला बोलावतील का?
मी म्हटले may be बोलावलं, तर जास्त भाव न खाता जायचं. अन नाही बोलावले तर तुमच्या बच्चेकंपनीत हुंदडायला मी. मोकळी.असे माझे साधे गणीत.
माझ्यामुळे शक्यतो कोणाला त्रास होऊ नये ह्या प्रयत्नात असते मी नेहमी. मात्र समोरचा माझ्यामुळॆ अवघडलेला बघुन मला नक्की काय करायचं हेच कळत नाही.त्यामुळे मला com.plex येतो, बाकी काही नाही.