माझी"जालिय"मुशाफिरी
आम्ही जेंव्हा इंदोरात वास्तव्याला होतो.तेंव्हा मला बराच रिकामा वेळ असायचा.
त्याच दरम्यानच्या काळात अभिनय पण वेब साठीकाम करायला लागल्याने घरात
अनायसा नेटचा वापर सुरु झाला. आणी माझ्या संगणक साक्षरतेला वरच्या वर्गात
जायला अनुमती मिळाली.
तेंव्हापासुन सुरु झालेल्या या मुशाफिरीची ही कथा आहे.नेट्वर माझ्या मेल आयडी
ने सुरु झालेला हा प्रवास हळुहळु ऑर्कुट्कडे कसा सरकु लागला हे कळले नाही.
त्यावेळी रोज दोनतीन तास ह्या साईट्वर वेळ जायला लागल्यावर
अपराधल्यासारखे व्हायचे खरे पण मन मात्र त्याकडे सारखे ओढ घेउ लागायचे.मग
मात्र आपण ह्याचे ऍडिक्ट होतो कि काय असे वाटायला लागले.त्यावर चर्चेअंती
असाही तोडगा निघाला की नेटवर अजुन काही उपयुक्त सापडते का याचा जरा
धांडोळा घ्यावा. त्यावर वेगवेगळ्या कम्युनिटी सापडल्या. आपल्यासारख्या
समविचारी लोकांच्या संपर्कात आपणच वेगळे नाही हे ही कळायला
लागले.नकारात्मक,त्रास देणार्या विचारांचा हळुहळु निचरा व्हायला लागला. नवे
वाचन होउ लागले.विवीध प्रांतातल्या लोकांच्या या जालिय भेटींनी त्या त्या
प्रांताची वैशिष्ट्य समजली. नजर विस्तारली विचार व्यापक झाले. आपल्या
दु:खापेक्षा जगात फार मोठे दु:खी आहेत याची जाण झाली अन माणुस म्हणुन मी
समृद्ध झाले.
याच दरम्यान मी हा ब्लॉग सुरु केला अन मनातल्या विचारप्रवाहाला इथे वाट
मिळाली.मिसळपाव मनोगत उपक्रम यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर
वेगवेगळ्या लोकांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या विचारांचे आदानप्रदान
झाल्याने एकाच विचाराचे अनेक पैलु समोर आले.
जालिय भाषा
फेसबुक ला चेहरापुस्तक असे नामकरण केले. त्याचेही संक्षिप्त रुप होउन चेपु असे
नाव जालावर रुढ झाले.संकेतस्थळ हे नाव ऐकल्यावर संदीप खरेचे गाणे न सुचता
जालीय साईटच आठवतात हे या नावाचे यश आहे.
जसजशी मी जास्त वेळ देत गेले तसतसे नवनवीन शोध लागत
गेले.व्य.नी,खरड,कट्टा हे शब्द मराठी संकेतस्थळावर नंतरनंतर सवयीचे हौ
लागले.
शुद्ध मराठीतील काही हद्दपार झालेल्या शब्दांना या जलिय भाषेने पुनरुज्जीवन
दिले.यावर लिहणारे विविध वयोगटातील सदस्य असल्याने जुन्या नव्याचा संगम
झाला अन आमच्या माहितीत भरच पडली.
डकवणे हा शब्द किंवा लिंका,लिंकाळ्या सारख्याच धाटणीचे वाटत असले तरी
डकवणे हा मराठी तर लिंका हा इंग्रजी लिंक्स चा मराठी अपभ्रंश आहे.
येथे लिहताना काही संकेतस्थळावर मराठी भाषा शुध्दतेचा फारसा विचार केला
जात नाही हे चांगले की वाईट या तपशिलात न जाता माझ्यासारख्या
सामान्यजनाला मनातले भाव कागदावर उतरवण्याएवजी बॉग वर पोस्ट करणे सोपे
झाले.परवलीचा शब्द,विरोप,गमन असे फार छान शब्द यामुळे प्रचलित
झाले.ह.ह.पु.वा,ह.घ्या यासारख्या शब्दांच्या लघुरुपाची गंमत कळण्यासाठी या
महाजालात डुबकी माराच महाराजा!
नेटवरचे सवंगडी
नेट्वर वावरताना काही स्वनामाने तर काही टोपणनावाने वावरताना दिसतात.
त्यानावांचेही संक्षिप्तरुप झालेले आहे.परिकथेतील राजकुमार
(पर्या),पाषाणभेद(यांचेही काही जालिय सदस्यांनी दगडफोड्या असे नामकरण केले
आहे.) , मदनबाण,टारझन(टार्या),चुचु,धमाल मुलगा(धमु) अशी बरीच मोठी यादी
आहे.काही त्यांच्या जालिय नावाने च इतके प्रसिद्ध आहेत की खर्या जगातल्या
त्यांच्या नावापेक्षा या वर्च्युअल जगातल्या नावानेच ते ओलखले गेले तर ती
अतीशयोक्ती ठरणार नाही.
यातुन मला सगळे मिळाले तर याला आभासी म्हणण्याचा करंटेपणा मी कसा
करु? कोणतीही गोष्ट अती केली तर ती वाईट हे मान्य पण आपल्या हरवलेल्या
आठवणींना उजाळा देणारे हे "नेटीय"नेट्केच वेचा म्हणजे झाले.