माझी ब्लॉग सूची

मंगळवार, सप्टेंबर २२, २००९

नवरात्र.

नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे.
गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची. त्यात येणारे पाळणे, खेळणी, शुंभ करोतीचे पुस्तक (ते आजीकडे अजूनही आहे) व वाटेत असणार्‍या गाडगीळ बाईंची भेळ (तशी भेळ मला भयानक आवडते) ही तेथे जाण्यासाठीची पुरक असणारी प्रलोभनं.

बहुतेक नवरात्रीत हादगा असायचा. त्यावेळी घरोघरी हादगा खेळायला, त्यातली गाणी जास्तीत जास्त मला येत असल्यामुळे मी आघाडीवर असायची. आमच्याकडेही एखाद्या दिवशी पाटावर हत्ती काढून त्याभोवती फेर धरला जायचा. चारला बाहेर पडलेली वरात अख्ख्या ब्राह्मणपुरीत फिरून साडेआठपर्यंत घरी येताना खिरापतीनं पोट भरलेली मात्र फेर धरून पाय टाकलेले, अशा थाटात घरी परतायची.'बालाजीची सासू, कसल्या भाज्या, कसल्या उसळी.... अशा खिरापती ओळखण्यासाठी लावलेला सूर अजुनही सगळ्या मैत्रिणींच्या आवाजानिशी आठवतो. आमच्याकडे राधाबाई नावाची एक कामवाली यायची. तिला राधाबाई म्हटल्यावर फार राग यायचा. तिला मावशीच म्हणायला लागायचं. तिच्या अंगात येत होतं.(तिच्या अंधार्‍या घरात एक- दोनदा बहिणीसोबत गेल्याचं आठवतंय.) मी खोदून खोदून तिच्याकडून माहिती मिळवायची, तेव्हा कळायचं नाही पण 'डोक्यात जट आल्यावर मी झाड झाले... असं काहीबाही ती सांगायची' त्यावेळी माझ्या वेण्या ती घालत असे. तेव्हा ती मुद्दाम माझ्या जटा (केसातला गुंता) न काढता ही मलाही झाड बनवेल अशी भीती कायम माझ्या मनात असायची.नंतर मिरज सुटलं मी नाशिकला आले. आजीच्या माहेरी रेणूका मातेचं मंदिर आहे. नवरात्रीच्या आदल्या रात्री मंदिर, गाभारा, मंदिरातील भिंतीवरील प्रतिमा, देवीची दागिने, पुजेचा सामान, सगळं साफ करताना रात्रीचे 2-3 वाजायचे. मंदिराचा गाभारा अगदी लहान होता. त्यात किरकोळ अंगकाठीचाच माणूस जाऊ शकत असे. त्यामुळे बाकी मंदिरे साफसुफ करायला मलाच जावे लागायचे. ते नऊ दिवस वातावरण भारलेलं राही. संध्याकाळी देवीसमोर सडा, रांगोळी काढली जायची. आमच्या शेजारी मारवाडी रहायचे पण ते सुध्दा खूप उत्साहाने या साफसफाईच्या कामापासून तर सजावटीपर्यंत सगळ्यात भाग घ्यायचे. त्यांची मुलगी तर रांगोळ्या सुरेख काढायची. संध्याकाळी तासभर आरती मग प्रसाद वाटप, रोज नवा ड्रेस, आपलं घरचं मंदिर म्हणून आरती म्हणताना पुढे पुढे करणं, अशा बर्‍याच गमती जमती असायच्या.अष्टमीचा होम, मग त्या दिवशी उपास अन् रात्री त्या धुराचा त्रास. कधी कधी रात्री ग्रुपने कालिकेला जायची धूम. एखाद्या रात्री गरबा बघायला जायचं. (तोवर आपल्याही गरबा चांगला जमेल याचा 'कॉ‍न्फिडन्स' नव्हता.) आजीच्या बहिणीच्या अंगात यायचं. अशा बर्‍याच बायका तेव्हा त्या मंदिरात जमायच्या. त्यांच्या विषयी काहीसं गुढ, भीती, कुतुहलही वाटायचं. त्याबरोबर ग्रुपनी त्यांची केलेली उडवाउडवीही आठवतेय. त्यानंतर भीतीही वाटायची, की़ त्यांना हसल्यावर काही झालं तर...? याच काळात आजीच्या बहिणीकडे कालीपूजा असायची, त्यावेळी ती बंगालीत काय बोलायची ते आम्हाला कळायचं नाही. पण तिच्याविषयी मात्र भीतीयुक्त गुढ कायम राहिलं. तिच्याकडचे प्रसादाचे रसगुल्ले मात्र आम्ही खायला जायचो.नाशिकची कालिकादेवी प्रसिद्ध. नवरात्रात कालिकेला रोज बायका सकाळी लवकर उठून अंघोळ करून पहाटेच जातात. आम्हीही जात असू. सगळ्या मिळून जाताना वाट कशी संपली ते कळतंच नसे. एवढेच अंतर एरवी चालून जाऊ म्हटलं तर ते अशक्य वाटे. तिथल्या जत्रेत मजा करायला जायचं तर ते म्हणजे रात्रीचं आणि ग्रुपने तरच धमाल यायची.गरब्याचं प्रस्थ आजकाल बरच वाढलय. आता इकडे मध्य प्रदेशात आल्यावर तर गल्लोगल्ली दांडिया दिसतात. आमच्या लहानपणी किंवा महाविद्यालयीन जीवनात वेगळ्या वातावरणात आम्ही राहिलो. त्यामुळे गरब्याचं अप्रुपही वाटतंय, पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्‍या वाळूसारखं वाटतंय.

शनिवार, सप्टेंबर १९, २००९

घननघनन घन घनन घन मंगल छायो.:मायबाप चित्रपटातील गाणी ही क्लासिकल बेस आहेत.त्यातील . " घनन घनन"हे गाण मी जेंव्हा पहिल्यांदा ऐकलं त्याच वेळेला मला ते गाणं प्रचंड आवडलं. त्यामुळे मला ते गाणं इथे लिहावसं वाटतयं.


घननघनन घन घनन घन मंगल छायो.:पावसाच्या नुसत्या चाहुलीनेही सगळीकडे वातावरण प्रसन्न झाले आहे.

बादलोंकी डोली मे बरखा आयो.:किती छान कल्पना आहे की ढगांच्या डोलीत बसुन एखाद्या राणी सारखी ती हळुहळु खाली अलगद उतरते आहे.

बुंदे हे दंग बिजुरी के संग बाजे मृदंग: पावसाचे हे टपोरे थेंब विजेच्या कडकडाटाबरोबरच मृदंगासारखाच नाद ह्या पृथ्वीवर येताना करतात असाच भास होतो.किती खरं आहे पहिल्या पावसाचा तो टपटप नाद अगदी नादवायला लावतो.

धरतीका अंग जलथल हो जायो: त्या पहिल्या पावसाच्या अशा वर्षावाने धरा अगदी अंतरबाह्य भिजुन जाते.

मनमन के द्वार खोले किवाड चले आरपार दु:ख तारतार:ह्या पावसाने मनाच्या सगळ्या दारंखिडक्या उघडल्या गेल्या आणी मनात खोलवर दाबुन ठेवलेली दु:ख ह्या पावसाच्या ओल्या शिडकाव्याने धुतली गेली.

मोरी प्यास बुझी फिर सुझ सुझी:किती खरं आहे जोवर स्वत:च्या प्राथमिक गरजाही भागल्या गेल्या नाहीत तर कोणी कितीही चांगुलपणाच्या गोष्टी सांगीतल्या तरी त्यासारखे वागणे जमेल का?पावसाचे कौतुकही त्याच्या आगमनाने तृप्त झाल्यावरच करणे शक्य आहे ना!

आयेहे एसे चैतन्य जैसे:तुझ्या येण्याने सगळीकडे नुसते चैतन्य सळसळले आहे.

मोरी उजड गयी मरुभुमी पर नाचे है मोर बनके फुहार:माझ्या ह्या ओसाड झालेल्या जमीनीवरही तुझ्या सरी मोराप्रमाणे थुईथुई नाचताहेत.त्यामुळे वातावरणच एकदम नादमय झाले आहे.

जल आयो जीवन आयो अब फिरसे सृष्टी जागेगी.:किती खरे आहे नाई.पाण्याशिवाय जगणे शक्य आहे का?धरेच्या उदरातुन अंकुर उगवण्यासाठीही पावसाचीच तर गरज आहे.

भुले बिसरे भटके देहं अब फिरसे दृष्टी जागेगी:मनातल्या जागलेल्या इछेमुळे डोळ्यात उद्याची स्वप्ने दिसु लागतील.

अब खिलेंगी कलिया और बहारे आनेको आतुर होगी:पृथ्वीच्या उदरातुन फुले उमलण्यासाठी उत्सुक असतील.सगळी झाडे फुलांनी,कळ्यांनी भरुन जातील.

इक राह मिली इक चाह मिली गिरनेसे पहिले बाह मिली:तुझ्या येण्याने मनात अनेक आशा निर्माण झाल्या. माझ्या जगण्याला अर्थ मिळाला.मला उध्वस्त होण्यापासुन तु वाचवलस.

बरसो तुम ऋतुराज निरंतर जीवन चलता रहे चिरंतर:किती यतार्थ वर्णन केलंय पावसाचं.खरच तो सगळ्या ऋतुंचा राजाच आहे.त्याच्यामुळेच इथे जीवन आहे.त्यामुळे तो कायम बरसतच रहावा.हे जीवन असेच पुढे चालु रहायला त्याच्यामुळेच मदत मिळणार आहे.पृथ्वीवरची जीवसृष्टी चिरंतर इथे आनंदाने नांदावी यासाठी तुच हवा आहेस.

आज है हम कल अगले होंगे,कालचक्र चलता जायो: आज तुझे गान गाणारे आम्ही आहोत. कारण तुझ्या कृपेची आज जशी आम्हाला गरज आहे,तशीच उद्या येणार्‍या पिढीचीही गरज भागवण्यासाठी तु असायलाच हवास.आम्ही आज तुझ्या कृपेचे अभिलाषी आहोत उद्या कोणी दुसरे तुझ्यासाठी आळवणी करतील,तेंव्हा तु मात्र असाच बरसत रहा.तरच हे कालचक्र चालु राहील.

किती आशेचे गान आहे हे!त्याची आळवणी फक्त स्वत:साठीच नाही तर उद्या येणार्‍या पिढीलाही त्याची गरज आहे हा किती मोठा विचार आहे.स्वत:पुरता विचार न करता आपण सगळ्यांच्या उपयोगी पडावे हा विचारही आपण पावसाकडुनच तर शिकलोय.तो ही नियमानी आपल्यासाठीच तर येतो.

शुक्रवार, सप्टेंबर ११, २००९

नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे भारती ठाकूर यांचे नर्मदा परिक्रमेवरचे पुस्तक म्हणजे आपल्या सारख्या शहरी मानसिकतेच्या लोकांसाठी हे एक जळजळीत अंजनच म्हणावे लागेल कारण आपल्या शेजार्‍याशी देखील आपण मदत करताना कचरतो,तिथे भारतीताईंना भेटलेली ही साधी अत्यंत गरीब पण मनाने फार श्रीमंत असणारी माणसे आपल्याला आपली जागा दाखवुन देतात. आपल्या दाराशी आलेला याचक बघताच त्याच्या हेतुविषयीच पहिल्यांदा आपण शंकीत होतो,पण खेडेगावात मात्र नर्मदा परिक्रमावासी लोकांना देण्यात येण्यार्‍या सदावर्तात ती लोक आपल्या जवळ अन्नाची कमतरता असताना स्वत: उपाशी राहुन त्यांना(परिक्रमावासींना)जी मदत करतात ते वाचुन आपल्या खुजेपणाची वारंवारं जाणीव होते.ज्या गावातुन त्या आणी त्यांच्या मैत्रीणी जात होत्या.ती गावं अतिशय साधी, तिथल्या घराघरांतुन त्यांचे पुर्वापार चालत आलेल्रे कष्ट तर दिसत होतेच पण वर्षानुवर्षे त्या मार्गावरुन जाण्यार्‍या परीक्रमावासीयांची काळजी घेण्याची व्रुत्तीही भरभरुन वाहत होती. भारतीताईंनी त्या त्या वेळी त्यांच्या मनात येणारे विचार त्यांच्या सखीशी गुजगोष्टींच्या स्वरुपात फार छान मांडले आहेत.प्रत्येक ठेकाणी आपल्या शहरी लोक़ांचा खुजेपणा तर वाचताना सारखा जाणवतो.आपण त्या गावकर्‍यांच्या जागी असतो तर खरच असे वागु शकलो असतो का?असा विचार सारखा मनात डोकावतो. . भारतीताईंची भाषाही फार सोपी आणी प्रवाही आहे.वाचताना तर त्या स्थानाची चित्रफीतच डोळ्यांसमोर असल्याचा भास होतो.वाटेत दिसणारे वेग़वेगळे पक्षी त्यांचे वर्णनही वाचनीय झाले आहे.जागोजागी आपल्यातला मी कसा जाणवतो,त्याचा भाव कसा बदलत जातो हे त्यांनी फार चांगल्या पध्दतीने मांडले आहे.एरव्ही आपल्या सुरक्षीत जगात वावरताना किती अकारण आणी अवाजवी गोष्टींचा संग्रह करत असतो हे ते वाचताना वारंवार जाणवते.स्वत:च्या सुरक्षीत जगात वावरतानाही आपण जेवढे निवांत नसतो त्याहुनही अधीक निवांत आपण त्या परिक्रमेत असताना होतो. वास्तवीक स्वत:कडे कोणताही संग्रह नाही.उद्या काय घडणार आहे त्याची शाश्वती नाही.एवढेच काय पण जेवणासाठीचीही तरतुद नसताना आपण कोणत्यातरी अद्न्यात शक्तीच्या भरवशावर आपण पुढे जात असतो.वाटेतल्या सगळ्या संकटाची काळजी घेणारा तो कोणत्या ना कोणत्यातरी रुपात आपली काळजी घेतो,मनातल्या बाळबोध इछाही तो पुर्ण करतो याचा प्रत्यय पदोपदी वाचताना येतो. वाटेत भेटणारे वेगवेगळे लोक,साधु,अध्यात्मातल्या अधिकारी व्यक्ती,आपल्या मनातल्या विवीध शंकांचे निराकरण अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचते.नर्मदेवर बांधण्यात येणार्‍या धरणामुळे विस्थापित होणार्‍यांचे वास्तव,त्याचे त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम लेखिका अगदी परीणामकारक रित्या आपल्यापर्यंत पोहोचवते.त्यातला ज्येष्ट व्रुध्दांचा प्रश्न तर डोळ्यातुन पाणीच काढायला लावतो.शहरी जीवनातील संकल्पना,आपले स्वत:चे नखरे,खाण्याच्या सवयी,स्वामित्वाची भावना,आपणच वाढवलेल्या आपल्या गरजा ह्या सगळ्यांची जाणीव पुस्तक वाचताना सारखी होत राहते.परिक्रमेत शारीर तसेच मानसीक सुद्रुढतेच्या कमाल पातळ्यांचा कस लागणार्‍या बर्‍याच घटना पुस्तकात वर्णीलेल्या आहेत.


परिक्रमेने काय मिळाले याचा विचार करताना आपले विचार,आचार आणी आपल्या जबाबदार्‍यांची जाणीव,निसर्गाचे जवळुन झालेले दर्शन अन त्यामुळे सम्रुध्द झालेले भावविश्व.आणी आपला कमी झालेला गंड या सर्वांचे शब्दचित्रण लेखिका आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाली आहे.

मंगळवार, सप्टेंबर ०१, २००९

गोळे काकु.

मिपावर भाषेसंद्र्भात दिलेल्या एका प्रतिसादात मी गोळे काकुंनी शिकवलेली भाषा वापरली होती। तेंव्हाच नवरा म्हणाला की त्यांच्याविषयी लिही. आमच्या मिरजेच्या घरात त्या व काका भाड्याने रहात होते.त्यांचे घर बांधायला काढले होते.त्या पाळणाघर चालवायच्या. परिस्थीती यतातथाच होती. पण त्यांच्या तेवढ्या परिस्थितीतही त्यांच्या घासातला घास त्या आम्हाला द्यायच्या.त्यांचे पाळणाघर एक आदर्श पाळणाघर होते.त्यांच्याकडे येणार्‍या मुलांना त्या रोज घरचा गरमागरम वरण भात खावु घालायच्या. मुलांना श्लोक, पाढे, शिकवायच्या. आमच्या घरात आजी,आजोबा आणी मी व माझा मावसभाउ रहायचो.तो आणी मी प्रचंड भांडायचो. तो तर माझ्यावरनं आजीशी पण वाद घालायचा. आमच्यातनं तर विस्तव पण जात नसे. आजीच्या डोळ्याच्या ओपरेशनच्या वेळी आठ दिवस त्या क़ाकुंनीच आम्हा दोघांना संभाळलं.
आत्ताच मी माझा ब्लोग मराठी ब्लोग विश्वला जोडला.सुरवातीला जोडायला जमले नाही.आता तुम्ही म्हणाल की हे सगळ काय लिहताय. पण पहिल्या लेखात लिहल्याप्रमाणे एका घरगुती बाईची ही एक साधी वही आहे. त्यात वेगळ असं काय सापडणार.