नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे.
गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची. त्यात येणारे पाळणे, खेळणी, शुंभ करोतीचे पुस्तक (ते आजीकडे अजूनही आहे) व वाटेत असणार्या गाडगीळ बाईंची भेळ (तशी भेळ मला भयानक आवडते) ही तेथे जाण्यासाठीची पुरक असणारी प्रलोभनं.
बहुतेक नवरात्रीत हादगा असायचा. त्यावेळी घरोघरी हादगा खेळायला, त्यातली गाणी जास्तीत जास्त मला येत असल्यामुळे मी आघाडीवर असायची. आमच्याकडेही एखाद्या दिवशी पाटावर हत्ती काढून त्याभोवती फेर धरला जायचा. चारला बाहेर पडलेली वरात अख्ख्या ब्राह्मणपुरीत फिरून साडेआठपर्यंत घरी येताना खिरापतीनं पोट भरलेली मात्र फेर धरून पाय टाकलेले, अशा थाटात घरी परतायची.
'बालाजीची सासू, कसल्या भाज्या, कसल्या उसळी.... अशा खिरापती ओळखण्यासाठी लावलेला सूर अजुनही सगळ्या मैत्रिणींच्या आवाजानिशी आठवतो. आमच्याकडे राधाबाई नावाची एक कामवाली यायची. तिला राधाबाई म्हटल्यावर फार राग यायचा. तिला मावशीच म्हणायला लागायचं. तिच्या अंगात येत होतं.(तिच्या अंधार्या घरात एक- दोनदा बहिणीसोबत गेल्याचं आठवतंय.) मी खोदून खोदून तिच्याकडून माहिती मिळवायची, तेव्हा कळायचं नाही पण 'डोक्यात जट आल्यावर मी झाड झाले... असं काहीबाही ती सांगायची' त्यावेळी माझ्या वेण्या ती घालत असे. तेव्हा ती मुद्दाम माझ्या जटा (केसातला गुंता) न काढता ही मलाही झाड बनवेल अशी भीती कायम माझ्या मनात असायची.
नंतर मिरज सुटलं मी नाशिकला आले. आजीच्या माहेरी रेणूका मातेचं मंदिर आहे. नवरात्रीच्या आदल्या रात्री मंदिर, गाभारा, मंदिरातील भिंतीवरील प्रतिमा, देवीची दागिने, पुजेचा सामान, सगळं साफ करताना रात्रीचे 2-3 वाजायचे. मंदिराचा गाभारा अगदी लहान होता. त्यात किरकोळ अंगकाठीचाच माणूस जाऊ शकत असे. त्यामुळे बाकी मंदिरे साफसुफ करायला मलाच जावे लागायचे. ते नऊ दिवस वातावरण भारलेलं राही. संध्याकाळी देवीसमोर सडा, रांगोळी काढली जायची. आमच्या शेजारी मारवाडी रहायचे पण ते सुध्दा खूप उत्साहाने या साफसफाईच्या कामापासून तर सजावटीपर्यंत सगळ्यात भाग घ्यायचे. त्यांची मुलगी तर रांगोळ्या सुरेख काढायची. संध्याकाळी तासभर आरती मग प्रसाद वाटप, रोज नवा ड्रेस, आपलं घरचं मंदिर म्हणून आरती म्हणताना पुढे पुढे करणं, अशा बर्याच गमती जमती असायच्या.
अष्टमीचा होम, मग त्या दिवशी उपास अन् रात्री त्या धुराचा त्रास. कधी कधी रात्री ग्रुपने कालिकेला जायची धूम. एखाद्या रात्री गरबा बघायला जायचं. (तोवर आपल्याही गरबा चांगला जमेल याचा 'कॉन्फिडन्स' नव्हता.) आजीच्या बहिणीच्या अंगात यायचं. अशा बर्याच बायका तेव्हा त्या मंदिरात जमायच्या. त्यांच्या विषयी काहीसं गुढ, भीती, कुतुहलही वाटायचं. त्याबरोबर ग्रुपनी त्यांची केलेली उडवाउडवीही आठवतेय. त्यानंतर भीतीही वाटायची, की़ त्यांना हसल्यावर काही झालं तर...? याच काळात आजीच्या बहिणीकडे कालीपूजा असायची, त्यावेळी ती बंगालीत काय बोलायची ते आम्हाला कळायचं नाही. पण तिच्याविषयी मात्र भीतीयुक्त गुढ कायम राहिलं. तिच्याकडचे प्रसादाचे रसगुल्ले मात्र आम्ही खायला जायचो.
नाशिकची कालिकादेवी प्रसिद्ध. नवरात्रात कालिकेला रोज बायका सकाळी लवकर उठून अंघोळ करून पहाटेच जातात. आम्हीही जात असू. सगळ्या मिळून जाताना वाट कशी संपली ते कळतंच नसे. एवढेच अंतर एरवी चालून जाऊ म्हटलं तर ते अशक्य वाटे. तिथल्या जत्रेत मजा करायला जायचं तर ते म्हणजे रात्रीचं आणि ग्रुपने तरच धमाल यायची.
गरब्याचं प्रस्थ आजकाल बरच वाढलय. आता इकडे मध्य प्रदेशात आल्यावर तर गल्लोगल्ली दांडिया दिसतात. आमच्या लहानपणी किंवा महाविद्यालयीन जीवनात वेगळ्या वातावरणात आम्ही राहिलो. त्यामुळे गरब्याचं अप्रुपही वाटतंय, पण माझं लहानपण, तो हादगा, त्या मंदिरातल्या आरत्या हे सगळं-सगळं हातातून निसटणार्या वाळूसारखं वाटतंय.
पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !
१४ वर्षांपूर्वी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा