आमच्या घराजवळ आप्पा नावाचा एक अंध व्यक्ती रहात असे त्याच्याभोवती नेहमी मुलांचे कोंडाळे जमलेले असायचे.कारण तो गोष्टी इतक्या रंगवुन सांगायचा की
त्या ऐकताना त्यात हरवुन जायला व्हायचे.
श्रवण माध्यमातुन सुरु झालेली ही गंगा त्याकाळात आजी बरोबर भजन किर्तनातुन वाढीला लागली.
मग चित्ररुपी गोष्टी असलेल्या छोट्या छोट्या पुस्तकातुन र ला ट जोडत हळुहळु वाचन सुरु झाले.
दुकानाच्या पाट्या,बोर्ड यासारख्या वाचनातुन वाचनाचा वेग़ अन शब्दसंग्रह वाढु लागला. चांदोबा,चंपक,ठकठक या सारख्या पुस्तकापासुन सुरु झालेले वाचन
मग इसापनिती,अकबर बिरबल पासुन ते रामायण महाभारतातल्या निवडक कथा,संतांच्या गोष्टी वगैरे पर्यंत वाढले.
माझ्या लहानपणी पोस्टाजवळ एक माणुस बसायचा तो दोन वाचलेल्या पुस्तकावर एक पुस्तक द्यायचा.त्याच्याजवळचा बर्यापैकी साठा मी वाचुन काढला होता त्यावेळी.
कॉलेजला असताना सायंसला असल्यामुळे आम्हाला अभ्यासेतर कलाशाखेची पुस्तके वाचण्याची परवानगी नव्हती.
मग कॉलेजच्या ग्रंथपालांना लग्गा लावुन मी त्या तीन वर्षात बरीच कलाशाखेला लावलेली विवीध लेखकांची पुस्तके वाचली.
प्रथम कथा कादंबर्या याप्रकारच्या वाचनप्रकाराशी मी जास्त जोडलेली होते.पण लग्नानंतर मात्र नवर्याने वेगवेगळी पुस्तके वाचावयास सांगीतली.सुरवातीला या प्रकारच्या वाचनाला नाखुश असणारी मी हळुहळु वैचारिक वाचनाकडे वळु लागले होते.
नाशिकच्या सा.वा.ना मध्ये असणारे खाते,अन रवीवारपेठेतले वास्तव्य माझ्या चांगलेच पथ्यावर पडले.दर दिवसाआड ह्या न्यायाने मी त्या दोन वर्षात बरीच पुस्तके वाचली.
नवरा पत्रकार असल्याने परिक्षणासाठी आलेली पुस्तकेही वाचनात आली.
माझ्या एकांगी झुकलेल्या विचारांना समतोलपणे बघायला यातल्याच काही पुस्तकांनी भाग पाडले.आधी पुस्तक हातात आल्यावर झपाटल्यासारखे वाचले जायचे पण नंतर वैचारिक पुस्तके वाचताना मला माझ्या वाचनातल्या मर्यादा लक्षात यायला लागल्या.विशेषत: अगदी घरातच घडणार्या आमच्या नवराबायकोच्या चर्चेतही वादविवादाच्यावेळी नवरा जेंव्हा इतर चार मुद्दे सांगायचा तेंव्हा आपल्या विशिष्ट प्रकारचीच पुस्तके वाचण्याच्या सवयीमुळे आपण एकांगीच विचार करतोय.हे ही जाणवायचे.
मग जे विषय आपल्याला रुचत नाहीत तरी त्यात त्यांनी काय म्हटलय ते तरी पहावे या विचारातुन न आवडणारे विषय,त्यावरची पुस्तके चाळायची सवय लागली.अंबरिष मिश्रांचे "गंगेमध्ये गागन वितळले" वाचताना तर खरच माझ्या मनातील एकतर्फी विचारांचे गगनच जणु वितळल्याचे मला भासले.मग गांधीवरच्या काही पुस्तकांच्या वाचनातुन काही विचार बदलतगेले काही पटले काही ठिकाणी थांबुन मागे वळुन बघावे वाटले.काही पटले नाहीत तरी नाण्य़ाच्या दुसर्या बाजुचीच न्हवे तर "मिती"चीही जाणीव झाली.
अगदी आजकाल वाचलेल्या मीरा अन महात्मा वाचतानाही नवीन माहिती उलगडत गेली.
राजवाड्यांचे विवाहसंस्थेचा इतिहास जेंव्हा चार वर्षांपुर्वी हातात आले तेंव्हा वाचताना ते पटले तर नाहीच पण खुप रागही आला.मात्र आत्ता चार वर्षांनंतर तेच पुस्तक परत वाचताना श्वास मोकळा झाला मनावरचे ओझे उतरल्याची जाणीव झाली.हे असे का व्हावे,मधल्या काळात बरेच वाचले त्यावरुन मतातही बदल होत गेलेला माझा मलाच जाणवला.
पुजापाठ कर्मकांड ह्यांना आत्यंतिक मानणारी मी आतुन बदलले,बदलत आहे.मग वाचनाने श्रध्दा कमी झाली म्हणावे का?
नाही. मला वाटते ती डोळस झाली त्यातली व्यर्थता जाणवली अन सगुणात आडकलेले, मला भावणारे देवत्व मला निराकारातही भेटु लागले अन त्यापेक्षा जास्तच भावु लागले,शांतवु लागले.
हे कशाने झाले तर त्या विषयाच्या वाचनाने,माहितीने माझ्या मनातली कोळीष्टके दुर केली.
शाळॆत असताना अवघड वाटणारा इतिहास अन भुगोल, मीना प्रभुंची भटकंतीची विवीध पुस्तके वाचुन आपला अन जवळचा वाटु लागला.हे वैश्वीक द्यान कोणी दिले तर पुस्तकांनीच.
शिवाजी राजे अन पेशवाईच्या सनावळ्या पाठ करताना तेंव्हा नाकी नउ यायचे पण आता कुठेही काहीही त्याविषयी वाचले तर लगेच ते आपले वाटु लागते.अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रवाचनातुन पेशवाईची घोडदौड उत्तरेला कशी झाली ते समजले अन सगळा इतीहास त्या काळ अन व्यक्तींसह
समोर आला.
वाचनाने मला काय दिले याचा विचार करताना मला त्याने समृध्द केले विचारांनी,भाषेनी.जगण्याची लय मिळवुन दिली एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जायला शिकवले.हे फक्त आपल्या मातृभाषेच्या वाचनाविषयीच नाही तर डॅन ब्राउन वाचताना मिशनरीही कळु लागले त्या धर्माचा उदय कोणत्या मुळ गोष्टींवर आधारित आहे हे ही कळले.
हिंदीतले पसराई,फणीश्वरनाथ रेणु,प्रेमचंद वाचताना त्या भाषेतल्या समृध्दतेचीही जाणीव झाली. मुस्लीम मन का आयना, बॅ.जीना वाचताना त्यांची विचारधारा कळु लागली.त्यामुळॆ कोणत्याही घटनेकडे जास्त तटस्थतेने बघण्याची सवय लागली.
एखाद्यावरची आंधळी भक्ती करायची सवयही वाचनानेच मोडुन काढली,त्याला देव मानुन निमुटपणे त्याचे अनुयायी होणे आता आवडेनासे झाले.प्रत्येक घटना वाचन तार्किकतेच्या अन व्यवहाराच्या पातळीवर कसोट्यांवर तासुन बघायची सवय वाचनानेच लागली.
आतातर वाचन हे फक्त पुस्तकी रुपात राहिले नसुन नेटवरच्या असंख्य ब्लॉग, संकेतस्थळांवरही इतके विपुल अन उच्च दर्जाचे साहित्य,चर्चा वाचावयास मिळते की तेही एक प्रगल्भतेकडे नेणारेसशक्त माध्यमच झाले आहे.
(लोकमत मध्ये पुर्वप्रकाशीत.)