माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, मार्च १८, २०११

हिंदुस्थानात जसजसे  वरवर  उत्तरेकडे सरकत जावे तसतसा होळीचा रंग चढत गेलेला दिसतो.या चढत्या रंगाची सुरवात मुंबईपासुन अहमदाबाद सुरत इंदोर भोपाळ  या मार्गे पार उत्तरप्रदेश बिहार पर्यंत पोहोचली आहे.
    प्रत्येक प्रांताचे तिथल्या स्थानिक वैशिष्ट्यांसह तिथे साजर्‍या केल्या जाणार्‍या सणसमारंभासहीत एक वेगळे  वैशिष्ट्य असते.मध्यप्रदेशात विशेषत: इंदोरमध्ये मनवली(हा खास इंदोरी मराठी बोलीतील शब्द आहे) जाणारी होळी  ही इतर वरच्या प्रांताप्रमाणे होळीच्या दिवशी साजरी न होता रंगपंचमी दिवशी खेळली जाते.कदाचित या ठिकाणी होळकरशाहीच्या स्थापनेपासुनच आपल्या रंगपंचमीची शान जपली जात असावी.
     होळकरांच्या काळात,चांदीच्या पिचकार्‍यांनी केशराचे पाणी उडवुन राजदरबार्‍यांमध्ये राजवाड्यात मानाची होळी खेळली जात असे.हीच परंपरा येथील जनतेने चालु ठेवलेली आहे. आजही तेथे कोणतेही सांस्कृतिक वा राजकिय प्रदर्शन (कार्यक्रम) राजवाड्याच्या साक्षीशिवाय साजरे होत नाहीत           आपल्याकडील मिरवणुकरथांप्रमाणे येथेही रंगांचे रथ निघतात.या रंगरथात दोन प्रकार असतात त्यांना फाग व गैर अशा नावानी  संबोधले जाते. फाग म्हणजे कोरड्या रंगाची धुळवड तर गैर म्हणजे रंगमिश्रीत पाण्याचा पुर्ण राजवाडा परीसरावर वर्षाव .या दोन्ही प्रकारच्या रंगोत्सवात  सामिल होणार्‍या लोकांबरोबरच आजुबाजुचे प्रेक्षक छान माखुन जातात.
      या रंगरथाबरोबरच राधा कृष्णाचे वेश परिधान केलेले युवकयुवती,फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात ,नाचत गात जाणारे सहभागी यांसह वेगवेगळे डिजे साउंडस अन त्यांच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे ही आपल्याकडील गणपतीच्या मिरवणुकांप्रमाणे एकामागुन एक आपापले सादरीकरण प्रस्तुत करत असतात.या प्रकाराला झॉंकी असे म्हणतात.
  जगण्याच्या प्रत्येक रसाचा आनंद चवीचवीने घेणारा खवैया इंदोरकर यावेळी रंगरंगीलाही होउन जातो हे वेगळे सांगायला नको.प्रत्येक घटना सण यांचा समरसुन आनंद घेण्याची वृत्ती इथल्या प्रत्येकाच्या नसानसात भिनली आहे.
     

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

होळीच्या दुसर्‍या दिवशी खेळली जाते ती धुळवड. या दिवशी प्रतिपदा असते.त्या दिवशी होळीच्या राखेत पाणी ओतल्यावर तयार झालेली राड एकमेकांच्या अंगाला फासतात. हल्ली रंगपंचमीला सुटी नसल्याने यादिवशीच रंग खेळला जातो.

संवेदना म्हणाले...

खरे आहे तुमचे म्हणणे. इंदोरी लोक मुळातच शौकिन असल्याने ते दोन्ही दिवशी होळी साजरी करतात. होळीच्या दिवशी वैयक्तीक पातळीवर तर रंगपंचमीच्या दिवशी सांघिक.