माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, मार्च १८, २०११

इये इंदुर नगरी

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
हे कौशल इनामदार चे गाणे ऐकताना अंगावर क़ाटा येतो राव. 80 वर्षांचे विठ्ठ्ल उमप अन ती आठ वर्षाची चिमुरडी मुग्धा दोघांनाही एका व्यासपिठावर आणुन समा बांधणारा, खरच ग्रेटच आहे.आज 28 तरखेला ह्या गीताला वर्ष पुर्ण झालेहा अजुन एक योगायोग
ह्या मराठी चा "अभिमान" काय वर्णावा! ह्या मराठीच्या अंगाखांध्यावर वाढलेले आम्ही एक दिवस अचानक इंदुरनगरीत जातो काय, अन नगरीच्याच नव्हे तर तिच्या भाषेच्याही प्रेमात पडतो काय, सारेच स्वप्नवत वाटते आहे.
इंदोरचे पहिले दर्शन मला भगभगीत वाटले होते. प्रचंड उन्हाळ्यामुळे सुरवातीला सानिध्यात आलेली माणसेही काहीशी रुक्ष जाणवली.पण एक दिवस आमच्या अहोंच्या ऑफिसात गेल्यावर स्मिताताई म्हणाल्या, अहो तुमच्या बायकोला काही'खिलवा पिलवा" अरे वा! मला त्यांच्या बोलण्यातला रिदम भारीच आवडुन गेला. मग मी तिकडच्या लोकांचे बोलणे जास्तच कान देउन ऐकु लागले.
कोपर्‍यावर "मुड्ले"की मग आमचे घर येते हा नवा शोध मला तिथे लागला. माझी मुलगी तर काय "भिया""तिथ्थल्ली"च होउन गेली.मला "गोदी" घे असे ती हात वर करुन म्हणाली की तिला उच्चुन घ्यावे लागे.(उच्चुन ह्या शब्दावर तीचा लहानपणी copyright होता.) तीच्या मैत्रिणीला"डरावनी"स्वप्न पडत असत. आम्ही आजकाल दुपारी "लेटत असु. तिथल्या लोक़ांच्या रोजच्या बोलण्यावर हिंदीचा प्रभाव असला तरी ती मावशीच्या भाषेला आपलेसे केलेली भाषा कानाला गोड वाटाय़ला लागली.
नाहीतरी साहित्यसंमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना कांबळेंनी सांगीतलेला "भिरभिरे" ह्या शब्दाच्या उगमावरुन त्यांनी बाकीच्या बोली भाषांना प्रमाण भाषेत सामावुन घेण्यावरुन आवाहन केले होतेच ना. मग त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या ह्या25 ट्क्के लोकांनी जपलेल्या भाषेला धेडगुजरी म्हणुन हिणवण्यापेक्षा तीला मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतल्यास आपल्या मराठीला कितीतरी नवीन शाब्दिक अन भाषिक अलंकारही मिळतील.
तिथले लोक निळ्या रंगाला "फिरौजी"रंग म्हणतात ते त्यांच्या तोंडुन ऐकताना इतकं छान वाततं ना.आपण बैगणी रंग म्हणतो ना तसा "गाजरी" रंग तिथल्या मराठीत खुपच प्रचलीत आहे. भगर ह्या शब्दाला "मोरधन" हा किती सुंदर शब्द आहे तिथे.शौच हा शब्द तिथल्या तिशीच्या वयोगटातल्या लोकांच्या तोंडुन ऐकताना सुरवातीला मला कसेसेच व्हायचे.पण आपण ह्या शब्दाला खरेच "हद्दपार" केल्याचे मला तिथे जाणवले."आलुची अशी झन्नाट भाजी फार बढीया लागते" म्हणणारे इंदोरकर नेहमी मस्त नाही तर"बढीया" असतात. तु करतीये का? तु येतिये का? हे त्यांच्या खास ढबीत ऐकताना थोडा नागपुरी भास होतो. करील्ले जाईल्ले अशा नागपुरी वळणाच्या अन अक्षरास जोडाक्षर बनवणार्‍या इथल्ल्या तिथल्ल्या शब्दांनी हळुहळु माझ्याही तोंडात बस्तान बसवायला सुरवात केली होती. ती भाषा कानाला छानच वाटायला लागली होती. मराठी शब्दांवर हिंदीचा प्रभाव असला तरी मराठी घरात मात्र आई आजी आत्या हे शब्द ऐकु येत होते. आताची नवीन पिढी दोन तीन वाक्यानंतर कधी हिंदीची "पटरी' पकडते हे कळत नसले तरी तिथल्या आज्ज्यांची मराठी अन रोज संध्याकाळी रामाच्या देवळात भरणारी संस्कारशाळा आपल्या महाराष्ट्रातही नाही ऐकायला येत.
तुळशीच्या लग्नाची खरी मजा मी इंदोरला अनुभवली. दिड ते दोन फुटी कृष्णाच्या मुर्तीची बग्गीतुन काढ्लेली मिरवणुक, कॉलनीतल्या चौकात मस्त लफ्फेदार शालु नेसुन उभी असलेली तुळशीबाई.आख्खी कॉलनी लग्नाला लोटलेली. लग्नानंतर बुंदी अन चिवडालाडु वाटप.अगदी खर्‍या लग्नासारखा थाटमाठ. गुढी,संक्रांत, त्यातली वाणं,चैत्रातले हळदीकुंकु,मंगळागौर अगदी यथासांग करायच्या तिथल्या बायका.बाळाच्या बोरन्हाण्याला "बोरलुट" असा छान शब्द कळला मला तिथे.ह्या सगळ्या गोष्टी तिथे हौसेने "मनवल्या' जातात.
पंढरीच्या वारी सारखीच तिथल्या राजवाड्याहुन पंढरीनाथ मंदिरापर्यंत दरवर्षी निघणारी दिंडी मला महाराष्ट्रातच असल्याचा अनुभव द्यायची.सानंद न्यास,मराठी समाज ह्यासारख्या कितीतरी संस्था महाराष्ट्राच्या बाहेर राहुन मराठी जपण्याचे कार्य करत आहेत ते खरेच वाखाणण्यासारखे आहे.अनंताच्या पुजेला लागणारा दर्भाचा नागही मला इंदोरात मिळाला होता. हे सगळे पोटतिडकीने सांगण्याचे कारण म्हणजे आपण इथे मराठी मृत होते का?ती टिकणार का यावर चर्चा अन वितंड्वाद घालत बसतो त्याऐवजी ह्या इतर प्रांतात बोलल्या जाण्यार्‍या मराठीला "हिंदाळलेली" न समजता आपली म्हट्लीत तर तिथे मराठीचे रोपटे जपणार्‍या आपल्याच बांधवाला मुख्य प्रवाहात सामावता येईल. म्हणुन मराठीतील संत शिरोमणींची क्षमा मागुन म्हणावेसे वाटते की,
इये ईंदुरीचिये बोली कवतुके.
रसिकांचिये मन जिंके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: