माझी ब्लॉग सूची

मंगळवार, ऑगस्ट २४, २०१०

भोचकराव वर स्वर्गात.

गेल्या महिनाभरापासुन नारदराव वर अस्वस्थ झालेले.एरव्ही त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहचण्याचा काही सवालच नव्हता.पण.....
20 तारख़ेला एक घोळ झाला अन चुकुन हा यम एका भोचक पत्रकाराला वर घेउन आला. बर हा पत्रकारही तिथे स्वस्थ बसेल तर तो भोचक कसला. त्याने केला त्याचा भोचकपणा सुरु. अन आता मात्र त्या देवलोकात गडबड उडाली.
काय करत असेल हा तिथे? बर इथे माझी काळजी वगेरे काहीही न करता तिथे गेला. आता तर तिथे डोक्याशी भुणभुण करायला बायक़ो पण नाही.(म्हणजे कोणी एव्हढ्या लवकर ह्याच्या प्रतिभेवर भाळुन मागे लागली नसली म्हणजे मिळवली.) असा हा विनापाश वर गेलेला बाबा, तिथे देवांनाही वेगवेगळे प्रश्न विचारुन नक़्क़ी भंडाउन सोडत असेल.
ज्याच्या अस्तित्वावरुन होणार्‍या वादविवादात जिंकणारा माझा अभि, त्यालाही तु नाहीसच हे ही मान्य करायला लावेल.
देवाने मात्र त्याच्या ह्या कृतीने माझ्यासारखा निष्ठावान भक्त मात्र गमावला हे निश्चित.
देवाने स्वत:चे स्थान घालवले त्या जागी माझ्या अभिचे अधिष्टापन झाले आहे. ह्यापुढे माझ्या देवघरात माझ्या अभिचीच पुजा होइल.
कालांतराने तु त्याला विसरशील असे सगळे म्हणतात. हे कसे शक्य आहे? इतके दिवस ज्याची सगुण भक्ती केली तो आता मानसपुजेत अनुभवायचा आहे.माझ्या लेकीपर्यंत पोहोचवायचा आहे.तो आहे. ठायी ठायी आहे माझ्यात रुजवलेल्या विचारातुन, त्याच्या लिख़ाणातुन,त्याच्या लेकीच्या रुपाने सगुण रुपातल्या अस्तित्वांशातुनही.
त्याला आवडणार्‍या "ना मै धर्मी ना मै अधरमी" ह्या गाण्यातुन अन शंकराचार्‍यांच्या "पुर्णमद पुर्णमिद........मनोबुध्यहंकार चित्तानी नाहं" ह्यातुन तो हेच सांगत गेला. त्याच्या विचांरांनीच मी थोडीतरी सावरु शकले.
आपण प्रेम करतो ते कशावर? ह्या नष्वर देहावर नाही त्यात राहणार्‍या मनावर. लौकीक अर्थाने आमचाही प्रेमविवाह होता. पण विवाहापुर्वीच्या चर्चेतही रंग रुप पैसा ह्या चर्चा कधी झाल्याच नाहीत. आम्ही एकमेकांना म्हणायचोही आपले चर्चेचेच विषय जास्त रंगतात.
माझा नवरा गमावला ह्या दु:खापेक्षा माझा मित्र,सखा अन माझ्या भटकंतीचा पार्टनर गमावला ह्याचे दु:ख जास्त आहे.
रोजच्या भेट्ण्यात संवादाची गरज नव्हतीच."शब्दावाचुन कलले सारे'" अशी अवस्था होती. 
कालेजात मैत्रिणी चिडवायच्याच की तुम्ही अगदी सारखे आहात.
त्या रात्री बहुतेक आत्म्यांचीही अदलाबदल झाली आहे. त्याचे अस्तित्व मला अजुनही आहे असेच वाटते.

५ टिप्पण्या:

महेंद्र म्हणाले...

प्रमोद देवांचा बझ वाचल्यावर समजलं होतं.
तसा माझा परीचय नव्हता,पण ब्लॉग वरचे लेख नेहेमी वाचायचो..
तुम्ही सावरलात, बघुन बरं वाटलं... जास्त काय लिहावे ते सूचत नाही.

हेरंब म्हणाले...

काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही... काळजी घ्या.

निरंजन म्हणाले...

नमस्कार,

माझ्या ब्लॉगच्या सुरुवातीच्या काळात अभिनय ची ओळख त्यांच्या एका प्रतिक्रियेमुळे झाली आणि त्यांचा ब्लॉग वाचू लागलो. त्यांची जागा तुम्ही घेतलीत हे पाहून बरे वाटले. आमच्या सद्भावना तुमच्या आणि तुमच्या मुली बरोबर आहेत. अधिक काय लिहिणे?

Sandip Parolekar..Goldsmith..! म्हणाले...

वहिनी नमस्कार... अभिनय सर.. माझे सर नव्हे तर ते माझे मित्र, थोरले बंधू, गुरु, होते. त्यांच्या अशा अपघाती निधनाने तुमच्यासह आमच्या काळजाला चटका लावला आहे. खरंच त्यांची जागा आता देव घरातच आहे. खरच परमेश्वर आता स्वतःचे स्थान गमवून बसला आहे, अशी सरांची किर्ती आहे. त्यांची जागा तुम्ही घेतलीत हे पाहून बरे वाटते... अनवाची काळजी घ्या... स्वतःला जपा...

संवेदना म्हणाले...

तुमच्या सगळ्यांच्या मदतीनेच मी उभी राहण्याचा प्रयत्न करते आहे अशीच साथ राहु द्या.